बुधवार 4 मे 2011

------ माणूस ------

होते पारदर्शी काचेपलिकडे
दारिद्र्य उघडे नागडे...
कशी झाकावी लाज त्यांनी
निर्लज्ज मी पाहतो तिकडे



व्रुद्ध कोणी जराजर्जर,
रोग राईत व्यापला
सिग्नल पशी चादरिवर
देह् होता खंगलेला
वेदना इतक्या त्याच्या की
दुःख माझे तोकडे
होते पारदर्शी काचेपलिकडे
दारिद्र्य उघडे नागडे...



दुरवरती भडकलेली
एक चिता मला दिसे
थंड झोतात . सि. च्या
मी माझ्या गाडीत बसे
मनुष्याच्या आयुष्याचे
गुंतत चाललेले कोडे
होते पारदर्शी काचेपलिकडे
दारिद्र्य उघडे नागडे...



स्टार्ट् केले विचारांना
गियर मनात टाकला
आरशात मागे सरकणारा
द्रुष्टिकोन मी बदलला
पुरे आत जन्मचक्र
विधात्याला साकडे
होते पारदर्शी काचेपलिकडे
दारिद्र्य उघडे नागडे...



प्राक्तनाच्या भोगाने
व्यथित कधी... कधी क्रुद्ध मी
माणूस होईन हे तर नक्की
जरी नाही झालो बुद्ध मी

जरी नाही झालो ' बुद्ध ' मी!!!

-------------- चकवा --------------

चाललो...कुठे
चाललो ... किती
लागला जणू चकवा
अवसेच्या राती




फसव्या किरणांचा
आधार नाही
कण कण हर एक...
अंधार वाही
विचार थांबले....
खुंटली मती
लागला जणू चकवा
अवसेच्या राती





तुझ्या सोबतीचा
चंद्र जरी होता
सापडल्या नाहीत
खुळ्या चोर वाटा
दरवाजा बंद
नभी...भिडल्या भिंती
लागला जणू चकवा
अवसेच्या राती





सावलीस सावलीचा
स्पर्श ही झाला
माझ्या शब्दात तरी
सूर तुझा न्हाला
ओंजळ भरलेली
रिकामी मिठी
लागला जणू चकवा
अवसेच्या
राती

------------------ जात ------------------

गंगधर भट...लगबगीने जंगलाच्या रस्त्याने गावाकडे चालला होता....

तस अंधारु लागलं होतं.... त्याला अंधाराचं,
जंगलाचं... जंगलातल्या जनावरांचं भय नव्हतं...
त्याला भय होतं ते रामोशांच्या वस्तीचं...

कारण भिवा रामोशी त्याच्या जीवावर उठला होता....

गंगधरला खरंतर त्याला भ्यायची गरज नव्हती..तो स्वतः पट्टीचा लाठीबाज होता...
पण भिवाच्या कु-हाडी पुढं त्याची लाठी काय चालली असती ?

लालचंद सावकाराच्या मुलाच्या मुंजीत वर्णभेदावरुन गंगधर आणि भिवाची बाचाबाची झाली होती...

झुडपातून चालताना... त्याला समोर काहितरी हलल्याची जाणीव झाली...
आणि काही कळायच्या आत एका प्रचंड रानडुकराने गंगधरला मुसंडी मारली.

लाठी सावरुन उठायच्या बेतात असलेल्या गंगधरच्या हातापायातलं त्राणच गळालं...
जेव्हा त्याने दूरवरुन त्याच्या दिशेने धावत येणा-या रानडुकराच्या
अंधारात चकाकणा-या डोळ्यात पाहिलं.

तो वेगवान यमदुत त्याच्या पासुन अवघ्या 4 फुटांवर असताना....
भयाकारी आवाज काढत जमिनीवर कोसळला...

आणि कराकरा पायताणाचा आवाज करत ...
भिवा त्या रानडुकराच्या बाजुच्या झाडीतुन बाहेर येताना दिसला.

डुकराच्या मानेत घुसलेली रक्ताळलेली वजनदार कु-हाड उपसून काढत...
खडूस पणे हसत...भिवा म्हणाला....
जनावरांना जात पात म्हाईत नसते...शास्त्रीबुवा..
वर... ब्रह्महत्येच...पाप...
शिव ! शिव !!

क्षणभर भिवाचे डोळे सुद्धा अंधारात चकाकल्या सारखे झाले

पुन्हा कराकरा वहाणांचा आवाज करत , डुकराला फरफटत तो निघुन गेला...

त्या रात्री... गंगधरकडे शिरापुरी आणि
रामोशांच्या वस्तीवर डुकराचा बेत होता !!!

---------- सावत्र भाऊ ----------

आई गेल्यावर...
आबांनी दुसर लग्न केलं तेच मुळी
गजाला पटतं नव्हतं...

पण काय करणार ?

सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे
गजाची सावत्र आई त्याच्या पेक्षा फक्त 2 वर्षांनीच मोठी होती.

सुरुवातीला महिनाभर...तर ती
...
गजाला
नोकरासारखंच वागवत असे....
गजाही निमुटपणे.. ती सांगेल ते काम ऐकत असे.

एक दिवस मात्र काय झालं कळल नाहि...
ति गजाशी फार प्रेमाने आणि नीट वागु लागली...

पुढे काही वर्ष सगळ सुरळित चाललं होतं...
गजालाही त्याच्या सावत्र भावाबद्दल प्रेम् होतंच....

गजा त्याच्या लहानपणि अगदी अस्साच दिसत असे...म्हणे.

पुढे काही दिवसांनी गजाची सावत्र आई... आबाना म्हणाली...
हा महिना चुकलाय.. माझा..
हे असं नाही चालणार...
मी तलुक्याला जाऊन आप्रेशन करुन घेते...

आबा काही न बोलता ... खाटेवर पडला.... आणि.. झोपी गेला.

खरंतर दोन वर्षापुर्वीच तो तालुक्याला
जाऊन नसबंदी करुन आला होता.

गजा बाहेर व-हांड्यात... झोपला होता....
आणि त्याच्या सोबत झोपला होता..

त्याच्या सारखाच दिसणारा त्याचा

सावत्र ' भाऊ '

------------- संडास -------------

अंधार झाला म्हणजे रात्र झालीच पाहिजे..
असं गणित गावाकडे अजिबात नसतं
तसं ही फासे पारध्यांना अंधाराचं भय ना रात्रीचं..

मळरानाच्या उजवी कडे पोलिस
पाटलाची चौकी होती...
चौकी कसली.. टपरीच ती..

दोन टेबल एक पिवळा बल्ब..
एक पण्यचा माठ, सडे तीन खुर्चा,
एक जाडा खांब आरोपीला बांधून ठेवायला,
आणि एक संडास !!!

दरोड्याच्या गुन्ह्याखाली आधीच बेदम मारहाण झलेल्या
सा फुट लांब अन् आडव्या अंगाच्याराक्या पारध्याला
राक्याला पोलिस पाटलाने खांबाला पार एकजीव करुन टाकला

बस.. भाड्या....गुमान.... सकाळी टाकतो तुला तालुक्याला...

राक्या पिवळे दात दाखवुन म्हणाला....सायेब्ब...
वाईच पोट हळु झालय आज... परसाकडं सोडा की..

दोन्हि हात आणि पाय एकमेकांना मजबूत बांधून पाटलाने त्याला संडासात ढकललं

आत घुसताना... राक्याच्या करगोट्याला सुरा...
मत्र चकाकल्या शिवाय राहिला नाही...

बोलून चालून पराधीच तो...
पाटलाच्या काळजात चर्र्र झालं

माठ घेऊन पाटील संडासाच्या मगच्या बाजुला गेला...
खिडकीवर माठ टेकवला !

सकाळी तालुक्यहून मोठठा..... साहेब आला...

काय पाटील.. कसा मेला आरोपी... ?

कुनी सांगाव साहेब... संडासल म्हून आत गेला होता... माळरान आहे...कुठुन जनावर आलं कसं... सांगू....
मी जाताना पाहिलं साहेब... दोन फुट होतं साहेब... पिवळ्या रंगाचं...

पंचनामा करा... संडासाच्या खिडकीला बारिक जाळी मारुन् घ्या तेवढी..

अन् एक घोट् पाणी पाजा...

पोलिस पाटील ग्लासामध्ये माठातलं हिरवट् पाणि भरु लागला !!!

---------------- मस्का पाव ----------------

रंगराव जंगम...
गावातील एक बडी आसामी....
जितका... पैशाने मोठा...
तितकाच मनाने...लहान...

माणूसकी शून्य!

सकाळ सकाळ .....रंगरावाच्या घरा बाहेर एकच गलका चालु होता...

रंगराव घोंगड घेतलेल्या...
एका भिका-याला...
काठीने मारत होता...

आणि तो बिचारा मुकाट मार खात होता....

साल्या... तो पाव ... मस्का लावलेला आहे...
माझ्या कुत्र्यांचा आहे...
त्याच्यावर नजर ठेवतोस ?

शेठजी... उपाशी आहे...
तो भिकारी ....गयावया करत होता.,

लाथ मारुन रंगरावने भिका-याला दूर सारला
आणि ट्रॅक्टर चालवत शेताकडं निघाला...

टेकडीच्या डावीकडं वळताना...
रंगरावला... जेजमेन्ट आलं नाही..

ट्रॅक्टर.....सरळ उभाच्या उभा, खली कोसळला...
रंगराव ट्रॅक्टर खाली चेचला गेला...

रंगरावची किंकाळी ऐकताच...
हलकट... रंगरावच्या.....
इमानदार कुत्र्यांनी मात्र
...
तोंडातला... मस्का लावलेला पाव... खाली टाकत....
आवाजाच्या दिशेने धूम ठोकली

चला भिका-याची ...आत्ताची तर सोय झाली !

......
आकाशात गिधाडांनी गर्दी केली...
रंगरावच्या छिन्न प्रेताभोवती....
भटके जंगली कुत्रे ही आसपास घुटमळु लागले....

सगळ्या कुत्र्यांना...
थोडंच...
आयतं मस्का पाव खयला मिळणार?

सोमवार 28 फेब्रुवारी 2011

http://www.facebook.com/video/video.php?v=178661552153451


दिलीप कल्याणी प्रस्तुत मराठी चित्रपट ' दुर्गा म्हणत्यात मला '
कथा/ पटकथा - दिलीप कल्याणी ....... दिग्दर्शक - राजू पार्सेकर
कलाकार - दिपाली सय्यद, मिलिंद गवळी, कुलदीप पवार, सुरेखा कुडची,
योगिता दांडेकर, स्वप्नील राजशेखर, संजय खापरे आणि साक्षी तिसगावकर
गीत - मंदार चोळकर, संजाली रोडे ....... संगीत - प्रवीण कुंवर
गायक - उर्मिला धनगर, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, आनंद शिंदे, कविता निकम